सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सुरू असलेल्या स्व-गणना मोहिमेला गती देत ती शंभर टक्के पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. १ मे २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी — आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच इतर मान्यवर व्यक्ती यांची स्व-गणना तातडीने पूर्ण करण्यात यावी. यासोबतच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्व-गणना करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.स्व-गणनेचा प्रचार व प्रसार प्रभावीपणे करण्यावर विशेष भर देत त्यांनी सांगितले की, गावपातळीवर मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, अंगणवाडी सेविका आणि आशा (ASHA) वर्कर यांच्या माध्यमातून जनजागृती केली जावी. तसेच नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रात कर संकलक आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घ्यावा.नवीन उपक्रम राबवून स्व-गणनेचे महत्त्व, कालावधी आणि प्रक्रिया याबाबत माहिती देणारे संदेश प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मोहिमेचा प्रभावी संदेश पोहोचेल असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.शैक्षणिक संस्थांनाही या मोहिमेत सक्रियपणे सहभागी करून घेत, स्वतःची स्व-गणना पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाची स्व-गणना करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांनी शेवटी सर्व संबंधित यंत्रणांना समन्वय साधून काम करण्याचे निर्देश देत, “स्व-गणनेचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने पुढाकार घ्यावा,” असे आवाहन केले.












