सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी । Kokanshahi ।

सिंधुदुर्ग राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असतानाच सायंकाळी आंबोली परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. तब्बल एक तास चाललेल्या या पावसामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला असून आंबा, काजू आणि फणस बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
एप्रिल महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात होरपळणाऱ्या सावंतवाडीकरांना आज सायंकाळी अचानक ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागला. आंबोलीत झालेल्या धोधो पावसाने हजेरी लावल्यामुळे ग्रामस्थांची मोठी धांदल उडाली. कोकणात सध्या आंबा आणि काजूचा हंगाम सुरू असतानाच या पावसाने बागायतदारांच्या तोंडचा घास हिरावला आहे. तयार झालेला आंबा, काजू आणि फणस या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला असून यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात अचानक आलेल्या या संकटामुळे शेतीकामांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून “आधीच दुष्काळ त्यात फाल्गुन मास” अशी अवस्था सध्या कोकणातील शेतकऱ्यांची झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता बागायतदारांमधून जोर धरत आहे. आता सरकारकडून मदतीचा हात कधी मिळतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.कोकणशाही सिंधुदुर्ग