गोठोसला वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घरांचे मोठे नुकसान

कुडाळ तालुक्यात आज झालेल्या वातावरणातील बदलाचा मोठा फटका गोठोस गावाला बसला आहे. सोसाट्याचा वाऱ्यामुळे येथील ग्रामस्थ राजाराम धोंडू खरात यांच्या घरावरील व समोरील मंडपाचे सर्व पत्रे उडून गेले असून, या दुर्घटनेत त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज कुडाळ तालुक्यात अचानक पावसाचे वातावरण तयार झाले होते. दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने गोठोस येथील खरात यांच्या घराला वाऱ्याचा तीव्र तडाखा बसला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, त्यांच्या राहत्या घरावरील पत्रे आणि घरासमोर उभारलेल्या मंडपाचे सर्व पत्रे हवेत उडून लांब फेकले गेले. या नैसर्गिक आपत्तीमुळे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घरातील साहित्याचीही नासाडी झाली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर राहत्या घराचे छप्पर उडाल्याने खरात कुटुंबियांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शासनाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे