श्रीयुत सतीश लळीत व डॉ सौ सई लळीत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
कुडाळ : वाचनवाट ग्रंथदालनाच्या वतीने तळकोकणात पुस्तक संस्कृती रुजवण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत यंदाचे पहिले भव्य पुस्तक प्रदर्शन आज कुडाळ हायस्कूलजवळील मराठा समाज हॉल, कुडाळ येथे अत्यंत उत्साहात सुरू झाले.

सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला आणि पहिल्या दिवशीच्या उपक्रमांना तळकोकणातील चोखंदळ वाचक, नागरिक व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
उद्घाटन सोहळ्यात बोलताना प्रमुख पाहुणे मा. सतीश व मा. डॉ. सई लळीत यांनी वाचनवाट ग्रंथदालनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ही वाचन चळवळ खरोखरच प्रशंसनीय आहे. आजच्या डिजिटल युगात मुलांना पुस्तकांशी जोडणे गरजेचे असून, त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी पालकांनी व विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांना व पुस्तक प्रदर्शनांना आवर्जून भेटी देण्याची गरज आहे, असे विचार त्यांनी या वेळी व्यक्त केले. यावेळी विवेक मुतालिक, संदीप मणेरीकर , ॲड अंजली मुतालिक उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनातील आगामी प्रमुख कार्यक्रम:
आज (१६ ऑक्टोबर) संध्याकाळी ५ ते ७: लहान मुलांसाठी विशेष कथाकथन आणि भाषिक खेळ (वयोगट ५ ते १२ वर्षे)
उद्या (१७ ऑक्टोबर) संध्याकाळी ४ पासून पुस्तक परिचय सत्र:
डॉ. बाळकृष्ण लळीत: दक्षिण कोकणच्या आध्यात्मिक रहस्यांच्या शोधात – शोधयात्रेच्या निमित्ताने.
सचिन मणेरीकर: ओळख पुस्तकांची.
मुग्धा शेवाळकर: सफर बालसाहित्याच्या विश्वातली
१८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता: सचिन मणेरीकर यांच्याद्वारे निवडक कथांचे अभिवाचन.
तळकोकणातील सर्व पुस्तकप्रेमी, वाचकवर्ग, शाळा व महाविद्यालयांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विविध प्रकारच्या पुस्तकांचा आनंद घ्यावा आणि या सुंदर वाचन चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे सचिन व मुग्धा मणेरीकर यांनी केले आहे.












