रत्नागिरीच्या मल्हारची सुवर्ण भरारी! २ सुवर्ण, १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेत धडक!

​रत्नागिरी : पुण्यातील बालेवाडी येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मल्हार श्रीकृष्ण सुतवणे याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत मल्हारने २ सुवर्ण आणि १ रौप्य पदकाची कमाई करत थेट राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. या यशासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणारा मल्हार हा रत्नागिरीतील पहिला व एकमेव दिव्यांग खेळाडू ठरला आहे.
​या राज्यस्तरीय स्पर्धेत मल्हारने पहिल्यांदाच सहभाग घेतला होता. प्रथमच मैदानात उतरूनही गेली ५ ते ६ वर्षे सातत्याने पदके मिळवणाऱ्या बलाढ्य व अनुभवी खेळाडूंना मागे टाकत त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आणि स्पर्धेत स्वतःची वेगळी छाप पाडली.
​मल्हारच्या या चमकदार कामगिरीमागे त्याचा कठोर सराव आणि प्रशिक्षक महेश मिलके यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे महेश मिलके स्विमिंग ग्रुपसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.