जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा केळुस कालवी येथे शरदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी – श्री. प्रशांत रेवणकर / केळुस कालवीबंदर : जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा केळुस कालवी येथे शरदोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व ईशस्तवनाने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, विविध नृत्यप्रकार आणि मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा आणि भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख व्हावी, हा या उत्सवामागील मुख्य उद्देश होता.

विद्यार्थ्यांच्या आकर्षक सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसर आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक रंगांनी उजळून निघाला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्तम सादरीकरण केले.

या शरदोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून, शालेय जीवनातील आनंददायी आठवणींमध्ये या उत्सवाची भर पडली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती, सखी सावित्री समिती , मुख्याद्यापक, शिक्षक वृंद, पालक आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.

अशा उपक्रमांमुळे शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र बनत असल्याचे या उत्सवातून दिसून आले.