जामसंडेत भीषण अपघात! उभ्या कारवर दुचाकीची जोरदार धडक; दोघे गंभीर

देवगड : देवगड-नांदगाव मार्गावरील जामसंडे येथील गणेशनगर परिसरात बलवान बेकरीसमोर शनिवारी दुपारी सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच देवगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधव घोगरे यांनी आपली क्रेटा कार बलवान बेकरीसमोर रस्त्याच्या कडेला उभी करून ते बेकरीमध्ये गेले होते. त्याचवेळी देवगडहून जामसंडेकडे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराचा कारवरील ताबा सुटल्याने दुचाकी थेट उभ्या कारच्या पाठीमागील भागावर आदळली.
धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील चालक आणि पाठीमागे बसलेली व्यक्ती रस्त्यावर फेकली गेली. दोघांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सुप्रिया बंगडे व पोलिस कर्मचारी आशिष कदम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास देवगड पोलीस करीत आहेत.