विश्वास ठरला सार्थ! फेरतपासणीनंतर अवंतिका देसाई तालुक्याची टॉपर

परुळे : परुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिरची विद्यार्थिनी अवंतिका अमेय देसाई हिने फेब्रुवारी २०२६ मधील इयत्ता १० वीच्या उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीत उत्तुंग यश मिळविले. फेरतपासणीनंतर तिच्या गुणांमध्ये वाढ झाली असून ती वेंगुर्ले तालुक्यात प्रथम आली आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अवंतिकाला फेरतपासणीपूर्वी ९७.८० टक्के गुण मिळाले होते. मात्र, गुणांवर पूर्ण विश्वास असल्याने तिने फेरतपासणीसाठी अर्ज केला होता.
तिचे मराठी व समाजशास्त्र या विषयांमध्ये एकूण तीन गुण वाढले आहेत. त्यामुळे तिचे अंतिम गुण ५०० पैकी ४९१ झाले असून तिने ९८.२० टक्के गुणांसह तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. अवंतिका देसाईच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अविनाश देसाई, उपाध्यक्ष डॉ. उमाकांत सामंत, सचिव अॅड. विशाल देसाई, सीईओ अमेय देसाई, मुख्याध्यापक सचिन माने, शिक्षक, पालक व परुळे ग्रामस्थांनी अवंतिका देसाई, तिचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे