देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाची गरज – खा. नारायण राणेंचे स्पष्ट वक्तव्य ; जामसंडे येथे भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट

देवगड : जिल्हयात रोजगार निर्मितीसाठी अणुऊर्जा प्रकल्प झालाच पाहिजे. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करून जिल्ह्याचा विकास होणार कसा? अणुऊर्जा प्रकल्प रोजगाराभिमुख असून हा प्रकल्प होणे काळाची गरज आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करू नये, अशी स्पष्ट भूमिका माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी देवगड येथील दौऱ्यात मांडली.
खासदार राणे यांनी बुधवारी दुपारी जामसंडे येथील भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान देवगड तालुक्यात प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन केले.
यावेळी माजी आमदार अॅड. अजित गोगटे, बाळ खडपे, भाजपचे जिल्हा सचिव प्रकाश गोगटे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, जि. प. महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, पं. स. सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, भाजपचे तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर, न. पं. गटनेते शरद ठुकरूल, भाजयुमो शहर अध्यक्ष दयानंद पाटील, महिला मोर्चा देवगड तालुकाध्यक्षा उषःकला केळुस्कर, न. पं. आरोग्य व स्वच्छता समिती सभापती बुवा तारी, पाणीपुरवठा समिती सभापती तन्वी चांदोस्कर, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांच्यासह जि. प. व पं. स. सदस्य, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ अध्यक्ष, नगरसेवक, सरपंच तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, फटाक्यांच्या आतषबाजीत खासदार नारायण राणे यांचे देवगड-जामसंडेनगरीत स्वागत करण्यात आले