नीलकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित बहुविध कौशल्यविकास उपक्रमाची दमदार सुरुवात

वाडा येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूल येथे बुधवार दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नीलकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित बहुविध कौशल्यविकास उपक्रमाचा शुभारंभ सोहळा दीक्षित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.निरंजन दीक्षित तसेच भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर तसेच कॉज टू कनेक्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.अनिरुद्ध बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबईचे उपाध्यक्ष श्री.सदानंद पवार, संयुक्त खजिनदार श्री.प्रदीप आंबेरकर, स्थानीय समिती अध्यक्ष श्री.शांताराम पुजारे, शाळा समिती अध्यक्ष श्री.हर्षद जोशी, स्थानीय समिती सचिव श्री.दिनकर जोशी, स्थानीय समिती सदस्य श्री.नारायण माने, श्री.रामकृष्ण परब, शाळा समिती सदस्य श्री.दर्शन नार्वेकर, श्री.महेंद्र मांजरेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता तेली,माजी मुख्याध्यापक श्री. संजीव राऊत, पडेल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. हिराचंद तानवडे, श्री.रमण पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाला. बहुविध कौशल्यविकास कार्यशाळा कक्षांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. यानंतर मान्यवरांचा परिचय व स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणात बोलताना डॉ.प्रसाद देवधर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सूक्ष्म निरीक्षण, कौशल्य ओळखण्याची क्षमता व भविष्यातील आव्हाने ओळखून काम करावे. श्री.दीक्षित यांनी आपल्या भाषणात कौशल्यविकासाची गरज अधोरेखित करत दीक्षित फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या उपक्रमांचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले. यासोबत श्री.प्रदीप आंबेरकर, श्री.हर्षद जोशी व श्री. शांताराम पुजारे तसेच श्री.अनिरुद्ध बनसोड यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यशाळेमार्फत अन्न प्रक्रिया, शेती, पर्यावरण व ऊर्जा तसेच अभियांत्रिकी यांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.स्मिता तेली यांनी, सूत्रसंचालन श्री.भूषण दातार तर आभार प्रदर्शन श्री.सचिन मोरे यांनी केले.