

दापोली (रत्नागिरी) : स्वप्नांना पंख फुटण्याच्या वयात असलेली गुणवंत विद्यार्थिनी अनुश्री मरकड आणि कुटुंबाचा आधार असलेल्या तिच्या आई सुवर्णा मरकड यांच्या अकाली निधनाने दापोली परिसर हळहळला आहे. एका क्षणात आईचे छत्र आणि बहिणीची साथ गमावलेल्या चिमुकल्या चिन्मयसमोर तर गंभीर जखमी अवस्थेतील अनिल मरकड यांच्यासमोर आयुष्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
पोलादपूर येथे झालेल्या भीषण अपघातात शनिवारी (ता. ३० मे) मृत्यू पावलेली अनुश्री मरकड ही दापोलीतील सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलची गुणवंत विद्यार्थिनी होती. नववीच्या परीक्षेत तिने ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. अभ्यासाबरोबरच बॅडमिंटन आणि नृत्य क्षेत्रातही ती उल्लेखनीय कामगिरी करत होती.
तिच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वामुळे ती शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींमध्ये लोकप्रिय होती. अनुश्रीची आई सुवर्णा मरकड या भारतीय स्टेट बँकेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होत्या. मनमिळावू, कर्तव्यदक्ष आणि मदतीसाठी सदैव तत्पर अशी त्यांची ओळख होती. अलीकडेच त्यांची फुरूस शाखेत बदली झाली होती. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला होता.
अनिल मरकड हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सहाय्यक कुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुटुंबातील लहान मुलगा चिन्मय या दुर्घटनेत बचावला असला तरी एका क्षणात आई आणि बहिणीला गमावण्याचे दुःख त्याच्या वाट्याला आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मरकड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दापोली शहरासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.











