‘EX INS गुलदार युद्धनौका’ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू; अफवांवर विश्वास ठेवू नका — MTDC चे आवाहन

सिंधुदुर्ग : “गुलदार” प्रकल्पाचे कामकाज नियुक्त तांत्रिक व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन MTDC कोकण विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक माने यांनी केले आहे.

तांत्रिक टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नौका आज सायंकाळपर्यंत समुद्रतळाशी यशस्वीरित्या स्थापित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण होताच त्याबाबतची अधिकृत माहिती सर्वांना कळविण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा आणि अफवा पसरत असताना प्रशासन व तांत्रिक यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे MTDC कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.