माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ (Mairtime Board) आणि नॉर्वेस्थित सागरी तंत्रज्ञान कंपनी ‘हायक एएस’ (Hyke AS) यांच्यात सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) प्रवासी जलवाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याकरिता कोची मेट्रो रेल लि. मार्फत एक सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. या डीपीआरमध्ये, सध्या प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या २१ जलमार्गांवरील २४ टर्मिनल्सच्या आधुनिकीकरणाचा, तसेच सुरू करण्यात येणाऱ्या १० नवीन जलमार्गांवर २१ टर्मिनल्सच्या बांधकामाचा प्रस्ताव आहे.
याप्रसंगी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प देशात आधुनिक जलवाहतुकीच्या एका नव्या युगाची सुरुवात करेल. त्यांनी सांगितले की, मुंबई महानगर प्रदेशाच्या वाढत्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार एक शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक प्रणाली विकसित करण्यास कटिबद्ध आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्र; मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी; मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार (गुंतवणूक आणि धोरण) कौस्तुभ धावसे; महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी.; नॉर्वेच्या मानद महावाणिज्यदूत मोनिका नागेलगार्ड; स्वीडनचे महावाणिज्यदूत स्वेन ऑस्टरबर्ग; हाइकचे अध्यक्ष चार्ल्स पेमब्रोक बिअर्स; रुरल एनहान्सर्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंबर अयाडे; नॉर्वेच्या नताशा ब्रागांझा; स्कँडियन नोचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत अग्रवाल; स्वीडन-भारत व्यवसाय परिषदेच्या भारतातील मुख्य प्रतिनिधी सेसिलिया ओल्डने; आणि इक्विलाइन फायनान्स, यूएईचे संचालक अंशुल दवानी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.












