कुडाळ : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (NEPHDO) यांच्यावतीने ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६ रविवार, १० मे रोजी कुडाळ येथे आयोजित केले आहे.
या संमेलनास, राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवरील पर्यावरणप्रेमी सहभागी होणार आहेत. कुडाळ उद्यमनगर येथील जय वासुदेवानंद हॉल (आरएसएन हॉटेलजवळ) येथे सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच यावेळेत हे संमेलन होत आहे. संमेलनाचे उद्घाटन सौ. नीलम नारायण राणे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सुयोग धस (संस्थापक) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सिनेअभिनेते तथा ब्रँड अॅम्बेसिडर, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे जयराज नायर तसेच विविध राजकीय, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास, हवामान बदल यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. वृक्षदिंडी, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, पर्यावरण जनजागृती कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यावरणप्रेमींचा सन्मान असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रांत पर्यावरणविषयक मार्गदर्शन, विशेष अतिथींची भाषणे आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
राष्ट्रीय, राज्यस्तरीय व स्थानिक कार्यकर्त्यांचा सहभागही मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. या संमेलनाद्वारे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे, पर्यटनाला चालना देणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. सर्वांच्या मदतीने व सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात नियोजनबद्ध केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












