मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलतधारक प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डच्या विक्रीत गैरप्रकार करणाऱ्यांवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जर एखाद्या अधिकृत विक्रेत्याने प्रवाशांकडून कार्डसाठी जादा दर आकारला, तर त्याचा परवाना तात्काळ रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप
सरनाईक यांनी दिला आहे.
राज्यभरात एसटीने ३००० हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती केली आहे. शासनाने या कार्डासाठी नवीन NCMC कार्डः १९९ रुपये, जुने स्मार्ट कार्ड बदलून मिळणारे कार्डः १४९ रुपये एवढे निश्चित केले आहे. मात्र, काही केंद्रांवर प्रवाशांकडून यापेक्षा अधिक रक्कम उकळली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी ही कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, काही विक्रेत्यांचे परवाने आधीच रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
डिजिटल प्रवासाकडे पाऊल
एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी NCMC कार्ड प्रणाली लागू केली आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी सुरू असून, भविष्यात सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी हे कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे.
आगार व्यवस्थापकांना निर्देश
प्रवाशांची अडवणूक होऊ नये यासाठी सर्व आगार व्यवस्थापकांना मानक कार्यपद्धती (SOP) काटेकोरपणे राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
सवलतधारकांनी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे देऊ नयेत आणि जादा दर आकारणाऱ्या केंद्रांची तक्रार नजीकच्या एसटी आगारात करावी.












