ज्येष्ठ पत्रकार तथा ‘साप्ताहिक कोकणी दणका’चे संपादक दयाळ कांबळे यांचे निधन

देवगड : देवगड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार तथा ‘साप्ताहिक कोकणी दणका’चे संपादक दयाळ गणपत कांबळे (वय ६७) यांचे बुधवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आरे येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले.

दयाळ कांबळे यांनी सुमारे ५० वर्षे पत्रकारितेत सक्रिय काम केले. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान होते. स्पष्ट वक्तृत्व आणि निर्भीड भूमिकेसाठी ते ओळखले जात. त्यांनी आपल्या साप्ताहिकातून नेहमीच ठाम आणि स्पष्ट लेखन केले. प्रारंभी त्यांनी ‘सिंधुदुर्ग वृत्त’ हे साप्ताहिक सुरू केले, त्यानंतर ‘कोकणी दणका’ची स्थापना केली. अनेक दिवाळी अंकांचे त्यांनी यशस्वी प्रकाशन केले होते.

देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सलग दहा वर्षे कार्य केले. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. राजकीय क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला. ते आरपीआयचे देवगड तालुका अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता आरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, भाऊ, पुतणे, जावई, नातवंडे आणि सुना असा मोठा परिवार आहे. देवगड पंचायत समितीच्या तळवडे मतदारसंघाच्या सदस्या सौ. सलोनी तळवडेकर तसेच ‘कोकणी दणका’चे कार्यकारी संपादक रत्नदीप कांबळे हे त्यांचे सुपुत्र होत.