महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट कळसुबाई शिखर गिर्यारोहण क्षेत्रात कणकवलीतला चिमुकला शोभित प्रशांत कासलेची गिर्यारोहकाची मोठी झेप

कणकवली : वयाने अगदी लहान, पण जिद्द आणि धाडसाने मोठा ठसा उमटवत कलमठ बाजारपेठ शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी शोभित कासले याने ‘महाराष्ट्राचे एव्हरेस्ट’ म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई शिखर यशस्वीरीत्या सर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १६४६ मीटर उंचीवर असलेले हे शिखर अहमदनगर–नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले असून, ते सर करणे कोणत्याही गिर्यारोहकासाठी आव्हानात्मक मानले जाते.

दि. २४ व २५ डिसेंबर रोजी झालेल्या या ट्रेकमध्ये शोभितने आत्मविश्वासाने सहभाग घेत शिखर सर केले. इतक्या कमी वयात कठीण चढाई पूर्ण करण्याची त्याची चिकाटी, शारीरिक क्षमता आणि धाडस कौतुकास्पद ठरत आहे. यापूर्वीही त्याने पावनखिंड ते विशालगड अशी अवघड पदभ्रमंती यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, गिर्यारोहण व ट्रेकिंगची त्याला विशेष आवड असल्याचे यातून स्पष्ट होते.

या मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण पाच जण सहभागी झाले होते. शोभितच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षक, पालक तसेच विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही तो गिर्यारोहण क्षेत्रात आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास सर्वांकडून व्यक्त केला जात आहे. कोकणशाही कणकवली