राजकोट येथे होणार ‘शिवजयंती’ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी

ओरोस ;

मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ब्राँझ धातूच्या उभारणीच्या कामाचा पायाभरणी समारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी किल्ले राजकोट येथे होणार आहे.
या कार्यक्रमासाठी खा. नारायण राणे, आ. दीपक केसरकर, आ. नीलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी सांगितले. विभाग, सावंतवाडी अंतर्गत हाती घेण्यात आले आहे.

या प्रकल्पाचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर असून काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेले आहे. या पुतळा उभारण्याच्या कामास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१
कोटी ७५ लाख रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुसार विभागाने या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून मे राम सुतार आर्ट्स क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीस कामाचे कार्यादेश ११ ऑक्टोबर २०२४ अन्वये निर्गमित केलेले आहेत. सदर पुतळा उभारण्याचे काम ईपीसी तत्त्वावर सुरू असून आजमितीस पुतळ्याचे १० फूट उंचीचे आरसीसी चौथरा उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे.महाराष्ट्र शासनामार्फत मालवण येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या तलवारधारी पुतळ्याची उंची ६० फूट इतकी असून संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात येत आहे. पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात येत आहे. तसेच चौथऱ्यासाठी एम५० या उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आलेला आहे. या पुतळ्याचे संकल्पन आयआयटी मुंबई या तज्ञ संस्थेकडून तपासून घेण्यात येत असल्याचेही किणी यांनी सांगितले.