माजी खा. विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या सुपुत्रावर गुन्हा दाखल

विवाहाच्या आमिषाने फसवणूक, अंधश्रद्धेच्या नावाखाली अमानुष अत्याचार; पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईतील एका महिलेच्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलीस ठाण्यात पती, सासरचे नातेवाईक आणि दोन बाबांसह एकूण सात जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात गितेश विनायक राऊत. विनायक भाऊराव राऊत, शामल विनायक राऊत, चुलत सासरे आवा राऊत, फिरोज बाबा (कोलगाव, ता. सावंतवाडी), काजी बाबा (करूळ घाट, ता. राजापूर) आणि हरीशचंद्र घाडी (नानेली, ता. कुडाळ) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, विवाह जुळविताना महत्त्वाची माहिती लपवून तिची फसवणूक करण्यात आली. विवाहानंतर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ करण्यात आला. वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर करण्याच्या नावाखाली तिला विविध बाबांकडे नेऊन अंधश्रद्धेच्या नावाखाली अंगारे-धुपारे, गंडेदोरे, लिंबू कापणे, कोंबडी फिरवणे, राख पाजणे आदी कथित अमानुष उपचार करण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम, २०१३ मधील कलम 3(2) व 3(3) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 115(2), 318(2), 351(2) आणि 85 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरनुसार, कथित प्रकार १ सप्टेंबर २०१८ ते १० जून २०२६ या कालावधीत घडल्याचा दावा करण्यात आला असून, १० जून २०२६ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप परमेश्वर धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.