भाजपाचे युवा कार्यकर्ते निनाद देशपांडे यांच्या संकल्पनेतून मोकाट गुरांना बसविण्यात येत आहेत रिफ्लेक्टर बेल्ट!



देवगड : देवगडमध्ये मोकाट गुरांमुळे झालेल्या अपघातानंतर आता केवळ चर्चा नाही, तर प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मोकाट गुरांसाठी कोंडवाडे उभारण्याच्या हालचाली सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनीही रस्ते सुरक्षित करण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रात मोकाट गुरांमुळे वारंवार अपघात घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने सकारात्मक आणि लोकहिताचा उपक्रम राबविण्यात आला आहे. भाजपाचे युवा कार्यकर्ते निनाद देशपांडे यांच्या संकल्पनेतून मोकाट गुरांच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी वाहनांच्या प्रकाशात हे रिफ्लेक्टर चमकणार असल्याने वाहनचालकांना दूरवरूनच रस्त्यावर गुरे असल्याचा अंदाज येणार असून अपघात टाळण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनीही या प्रश्नाची गंभीर दखल घेत मोकाट गुरांसाठी कोंडवाडे उभारण्याच्या दृष्टीने तातडीने हालचाली सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्याही दिशेने प्रशासनाची पावले पडू लागली आहेत.
रस्ते सुरक्षा आणि जनहिताला प्राधान्य देत देवगड भाजपाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अशा लोकहिताच्या उपक्रमांमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, योगेश चांदोस्कर, दया पाटील, वैभव करंगुटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.











