सिंधुपुत्र अमित कदमांचा भव्य सत्कार; Mr. Universe विजेत्याचा पालकमंत्री नितेश राणेंकडून गौरव

फोंडाघाट :आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर क्षेत्रात भारताचा झेंडा अभिमानाने फडकवत Mr. Universe स्पर्धेत सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदक पटकावणारे सिंधुपुत्र बॉडीबिल्डर अमित अनिल कदम यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज येथील ओम गणेश निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
जिल्हावासियांसह देशाची मान आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात अभिमानाने उंचावणाऱ्या हरकुळ खुर्द येथील अमित कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. अनेकांनी तिरंगा हातात घेऊन अमित कदम यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा आनंद साजरा केला.
अनेक वर्षांची मेहनत, कठोर प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवनशैली आणि जिद्दीच्या जोरावर अमित कदम यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधीत्व करत महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या यशामुळे कोकणासह महाराष्ट्रातील तरुणांना मोठी प्रेरणा मिळाली आहे. अमित कदम यांनी सांगितले, ‘हे यश माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या देशवासियांचे प्रेम, कुटुंबाचे आशीर्वाद आणि सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी हे यश मिळवू शकलो. हे पदक मी भारताला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करतो.’
पालकमंत्री नितेश राणे यांची कदम यांनी सदिच्छा भेट घेतल्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अमित कदम यांचा सत्कार करण्यात आला. बबन हळदिवे, माजी सभापती सुजाता हळदिवे, विश्वनाथ जाधव, हेमंत फोंडेकर आदी उपस्थित होते.