मालवण : वायरी येथील एका छोट्या स्वीमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने श्रेणिक मिलिंद टाकळे (वय २५, कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. कागल येथील दहा मित्र शनिवारी पर्यटनासाठी मालवणमध्ये आले होते. ते वायरी येथील एका रिसॉल्टमध्ये उतरले होते. रविवार, (२१ जून) रोजी दुपारी काही मित्र खोलीमध्ये होते तर काही मित्र स्वीमिंगचा आनंद लुटत होते. छोट्या स्वीमिंगपूलमध्ये लहान मुलांसाठी आनंद लुटण्याच्या चार फुटांच्या भागामध्ये श्रेणिक याने आठ ते दहा फुटांवरून उडी घेतली. श्रेणिक याने उडी घेतल्याने तो थेट पुलाच्या तळाशी जाऊन आपटला. यात त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. त्याच्या मित्रांना तत्काळ त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. श्रेणिक हा अविवाहित होता. त्याच्या कुटुंबीयांना दुर्घटनेची माहिती देण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात येत होती. श्रेणिक यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत विच्छेदन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुर्घटनेची माहिती घेतली. यानंतर मृतदेह विच्छेदन कक्षात ठेवून पंचनामा करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जितेंद्र पेडणेकर हे करीत आहेत.












