मालवणात मोकाट कुत्रे-गुरांचा उच्छाद; ज्येष्ठ नागरिकांची आमदार आमदार निलेश राणेंकडे धाव!

मालवण : शहरात मोकाट गुरे व कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे
लागत आहे. मालवण नगरपालिकेचे वारंवार लक्ष वेधूनदेखील कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे या विषयात गांभीर्याने लक्ष घालून मोकाट गुरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मालवण धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक लिलावती नारायण परब व कमलाकर खोत यांनी आमदार नीलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालवणात विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आलेल्या आमदार नीलेश राणे यांची कमलाकर खोत आणि लिलावती परब यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. मोकाट गुरे व कुत्र्यांपासून होणाऱ्या त्रासाबाबत व्यथा मांडली. शहरात मोकाट गुरांचा संचार वाढला असून त्यांच्याकडून शेतीची नासधूस होत आहे. मोकाट गुरांची संख्या वाढतीच राहिली आहे. मोकाट कुत्र्यांचा उच्छाददेखील वाढला असून आतापर्यंत २९८ लोकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या. याबाबत मालवण नगरपालिकेचे गेली अनेक वर्षे वारंवार लक्ष वेधण्यात आले. मात्र, नगरपालिका गांभीर्याने घेत नसून कोणतीही दखल घेतली गेली नाही. आमदारांनी लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.