
मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांसंदर्भात आज मंत्रालयातील माझ्या दालनात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आणि प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत शिवनीबांध मत्स्य बीज केंद्र भाडेपट्टीने देण्याबाबत, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे प्रस्तावित मत्स्यव्यवसाय व जलशेती पायाभूत सुविधा विकास निधी (FIDF) प्रकल्पाबाबत, उजनी धरणात मत्स्यबीज सोडण्यासाठी प्लुटस सर्व्हिसेस या ठेकेदारास मुदतवाढ देण्याबाबत तसेच सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम येथील शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र भाडेतत्त्वावर देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
याशिवाय, शाश्वत विकास ध्येयांमध्ये (SDGs) मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित निर्देशकांमध्ये सुधारणा करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा राबविणे, ससून डॉक सामंजस्य करारानंतर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा, मरोळ मच्छिमार मार्केट विकास प्रकल्पाची प्रगती तसेच मच्छिमार महिलांसाठी हँडग्लोज व गमबूट उपलब्ध करून देण्यासंदर्भातील कार्यवाही यावरही सविस्तर चर्चा झाली.
बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.












