कणकवली : येथील पेट्रोल पंपानजीक एका वृद्ध महिला दुकानदाराला बोलण्यात गुंतवून दोन अनोळखी भामट्यांनी ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लंपास केली. या प्रकरणी दुकानदार मायावती भाईनाथ रजपूत (७०, कलमठ-गोसावीवाडी) यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मायावती रजपूत यांचे कणकवली पेट्रोल पंपनजीक दुकान आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या दुकानात कंबरेचा पट्टा खरेदी करण्याच्या बहाण्याने आले. एकाने २०० रुपये किमतीचा पट्टा खरेदी केला. त्यानंतर अन्य एकाने मायावती यांना ‘येथे जवळपास कुठे देवीचे मंदिर आहे का?’ अशी विचारणा केली. त्यावर मायावती यांनी जवळच भालचंद्र महाराजांचा मठ असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने ‘आम्हाला मंदिरात देणगी द्यायची आहे’, असे सांगितले. त्यानंतर त्याने एका कागदावर तीन हजार रुपये रोख ठेवले आणि मायावती यांना सांगितले की, ‘तुमच्या गळ्यातील चेन या कागदावर ठेवा. मला तुमचे काहीतरी पुण्य मिळेल.’ मायावती यांनी ती चेन खोटी असल्याचे सांगितले. मात्र, भामट्यांनी त्यांना आपल्या गोड बोलण्यात असे काही गुंतवले की, मायावती यांनी आपल्या गळ्यातील चेन त्यांना काढून दिली. त्यांनी ती चेन कागदात बांधली आणि ती कागदाची पुडी मायावती यांच्या हातात दिली. मायावती यांनी ती पुडी उघडून पाहिले असता त्यात काळी राख असल्याचे दिसले. तोपर्यंत ते दोन्ही भामटे तिथून पसार झाले होते.
आपली फसवणूक झाल्याचे आणि गळ्यातील सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. चोरी करून पळून गेलेल्यामधील एकाने पांढऱ्या रंगाचा फूल हाताचा शर्ट, निळी पॅन्ट, पाठीवर सॅक (बॅग) आणि डोक्यावर काळ्या रंगाची टोपी, तर दुसयाने काळ्या रंगाचे जॅकेट, काळी पॅन्ट आणि डोक्यावर हेल्मेट घातले होते.












