बांधकाम सभापतींची कार फोडली; पोलिस चौकशीची मागणी

वैभववाडी : वैभववाडीचे बांधकाम सभापती रणजीत तावडे यांची कार अज्ञाताने फोडल्याने वैभववाडीमध्ये खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी तावडे यांनी केली आहे. वाभवे-वैभववाडी नगर पंचायतीचे बांधकाम सभापती तावडे यांच्या व्हॅगनार कारची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून या प्रकरणी तावडे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे वैभववाडी शहरात खळबळ उडाली आहे.
रणजीत तावडे यांचे वैभववाडी बाजारपेठेत चायनीज सेंटर आहे. सोमवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान चायनीज सेंटर बंद करून ते घरी गेले. त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यांनी घरापासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला आपली कार उभी केली होती. त्यानंतर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा भाऊ घरी आला असता गाडी सुस्थितीत होती. मात्र मंगळवारी सकाळी कारची मागील काच फोडलेली नळ कामगारांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ याची माहिती तावडे यांना दिली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर तावडे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.
रणजीत तावडे म्हणाले, ‘आपले कोणाशीही राजकीय वैमनस्य नाही. तरीदेखील अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करून शहरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न कोण करीत असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तसेच परिसरातील खासगी घरांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणीही पोलिसांकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.