मालवणमध्ये २६ मेपासून जलपर्यटनाला ब्रेक; स्कूबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्स बंद

मालवण : पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता, मालवण बंदर क्षेत्रात २६ मे २०२६ पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालवण बंदर निरीक्षकांनी काढलेल्या अधिकृत पत्रानुसार, २६ मे २०२६ ते ३१ ऑगस्ट या पावसाळी कालावधीत सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, सर्व प्रकारच्या जलक्रीडा आणि नौकाविहार, स्कूबा डायव्हिंग या बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या १३ मे २०२६ च्या पत्राचा संदर्भ देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. इनलँड व्हेसल्स ऍक्ट, १९१७अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व जहाजांना, बोटींना आणि जलवाहनांना या मान्सून काळात सुरक्षिततेच्या कारणास्तव आपली वाहतूक आणि व्यावसायिक उपक्रम थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
हा आदेश मालवणमधील एकूण ३९ प्रमुख संस्था, गृहनिर्माण व पर्यटन सोसायट्या आणि वैयक्तिक बोट चालकांना थेट बजावण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, चिवला जलपर्यटन संस्था, तारकर्ली, देवबाग, दांडी येथील बोटिंग संघटना व वॉटर स्पोर्ट्स संस्था, तसेच स्थानिक स्कूबा डायव्हिंग व्यावसायिक आणि वैयक्तिक बोट मालकांचा समावेश आहे.
कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. अशा परिस्थितीत पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, म्हणून दरवर्षी प्रशासनातर्फे ही खबरदारी घेतली जाते.