सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी आलेल्या कणकवली तालुक्यातील नरडवे येथील महिलेच्या पर्समधील डबीतील सुमारे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचा प्रकार मंगळवारी घडला. याबाबतची तक्रार सौ. क्रांती सावंत (रा. नरडवे, कणकवली) यांनी बुधवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.
नरडवे येथील तक्रारदार क्रांती सावंत ह्या पतीसह बुधवारी सकाळी १०.३० वाजता कारिवडे येथे साखरपुडा व लग्न समारंभासाठी निघाल्या. क्रांती सावंत यांनी पर्समध्ये सोन्याचे दागिने असलेली डबी ठेवली होती. एसटी बसने नरडवे ते कणकवली व तेथून कणकवली ते सावंतवाडी असा प्रवास त्यांनी केला. दुपारी सावंतवाडी-कारिवडे एसटी बसने नातेवाईकाच्या घरी ते पोहोचले. सोन्याचे मंगळसूत्र, हार, अंगठ्या असलेली पर्स लग्न घरात ठेवली व वॉशरुमला जाऊन परत १० मिनिटात खोलीत आल्यावर त्यांनी पाहिले असता पर्समध्ये दागिने नव्हते. सगळीकडे शोध घेतला, मात्र दागिने कुठेही मिळाले नाहीत. साखरपुडा झाल्यानंतर तक्रारदार यांचा मुलगा आई-बाबांना गावी घेऊन जाण्यासाठी आला. नंतर नरडवे येथे ते घरी पोहोचले. घरी चुकून दागिने राहिले नाहीत ना याची खात्री केली. मात्र दागिने मिळाले नाहीत. म्हणून बुधवारी पुन्हा कारिवडे येथे जाऊन शोध घेतला. मात्र दागिने न मिळाल्याने क्रांती सावंत यांनी सुमारे ३.९० लाखाचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.












