वादळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने निवती लाईट हाऊस याठिकाणी खोल समुद्रात पर्यटकांना घेऊन जाऊ नये, असे आदेश मालवण बंदर निरीक्षकांनी दिले आहेत. तसेच, पर्यटन व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
बंदर विभागाने दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, सध्या मालवण बंदरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असून मालवण बंदर हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणावरून निवती लाईट हाऊस याठिकाणी खोल समुद्रात पर्यटकांना घेऊन काही बोटी जात असल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे.
मान्सूनपूर्व कालावधी जवळ आला असल्याने समुद्रात कोणत्याही क्षणी वादळसदृश स्थिती निर्माण होऊ शकते. तसे झाल्यास खोल समुद्रात गेलेल्या प्रवासी बोटीला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन जीवित व वित्त हानी होऊ शकते. वरील बाबींचा विचार करता सध्याचा पर्यटन हंगाम संपेपर्यंत कोणीही निवती लाईट हाऊस जवळ किंवा खोल समुद्रात पर्यटकांना घेऊन बोट सफर करू नये. अन्यथा, संबंधितांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे बंदर निरीक्षक, मालवण महाराष्ट्र सागरी मंडळ यांनी म्हटले आहे.












