सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून महत्त्वाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस, म्हणजेच ७ आणि ८ मे रोजी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ आणि ८ मे रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच या कालावधीत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. झाडाखाली उभे राहणे, तसेच उघड्यावर प्रवास टाळण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.
हवामानातील या बदलामुळे शेती, वीजपुरवठा आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.












