ग्रामस्थ कोटकामते, ग्रामपंचायत कोटकामते, शाळा व्यवस्थापन समिती तसेच आजी-माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. केंद्रशाळा कोटकामते नं. १ येथील आदरणीय केंद्रमुख्याध्यापक मा. श्री. मनोहर मुणगेकर सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळा दि. २ मे २०२६ रोजी सायं. ४.०० वाजता मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला.

या कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मुणगेकर सरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
मा. मुणगेकर सर यांनी आपल्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले. आनंददायी व कृतीयुक्त शिक्षण, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम तसेच डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले आहे.
कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सरांच्या कार्याचा गौरव केला, तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले. कार्यक्रम अधिक संस्मरणीय करण्यासाठी सिंधू संजीवन संस्था, देवगड यांच्या संकल्पनेतून काही विशेष उपक्रम राबविण्यात आले.

👉 ‘हर घर भगवद्गीता’ उपक्रमांतर्गत श्री लक्ष्मी नारायण फाउंडेशन यांच्या सहकार्याने स्व. नारायण (बाबा) रावजी दळवी यांच्या स्मरणार्थ इयत्ता ४ थी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे विनामूल्य वितरण करण्यात आले.
👉 २०११ इयत्ता ५ विच्या माजी विद्यार्थ्यांमार्फत इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना ‘श्यामची आई’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
👉 गुरुकृतज्ञता स्मृतीवृक्ष उपक्रम
गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा आणि तीन पिढ्यांना जोडणारा हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहे. जेष्ठ नागरिकांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून सध्याच्या विद्यार्थ्यांना स्मृतीवृक्ष प्रदान करण्यात येतील. हे वृक्ष विद्यार्थ्यांनी आपल्या अंगणात किंवा बागेत लावून त्यांचे संगोपन करायचे आहे. दरवर्षी त्याची पाहणी केली जाईल व पाच वर्षांनंतर उत्तम संगोपन करणाऱ्यांना बक्षिसे देण्यात येतील. हा उपक्रम वनमहोत्सव (१ ते ७ जुलै) निमित्त मा. श्री. संजय जोईल खुडी व श्री. गोविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.
तसेच या सोहळ्याचे औचित्य साधून शाळेच्या शेतीफार्म परिसरात दगडी कंपाऊंड बांधकामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी माजी उपसरपंच श्री. विजय केशव कुडपकर यांनी प्रारंभी एक लोड चिऱ्याचा पुरवठा करून सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मा. मुणगेकर सर यांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्व सहकारी, विद्यार्थी व ग्रामस्थांचे आभार मानले.
या कार्यक्रमास तहसीलदार देवगड मा. श्री. रमेश पवार, जिल्हा महिला व बालकल्याण सभापती श्रीमती नारकर, उपसभापती पं. स. देवगड मा. श्री. अमोल लोके, जि. प. सदस्या श्रीमती सावी लोके, पं. स. सदस्या श्रीमती ऋतुजा खाजणवाडकर, चव्हाण मॅडम, केंद्रप्रमुख श्री. रमेश राठोड, सिंधू संजीवन संस्था अध्यक्ष श्री. गोविंद घाडी, सरपंच श्री. गणेश घाडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष मेस्त्री, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री. हरिश्चंद्र राऊत, श्री भगवती संस्थान देवस्थान ट्रस्टचे मा. सचिव श्री. सुनील कामतेकर, जेष्ठ नागरिक श्री. राघो पोकम माजी तंटा मुक्ती अध्यक्ष श्री. तुकाराम राऊळ, अनंत आधार नर्सरी खुडीचे सर्वेसर्वा श्री. संजय जोईल आणि इतर अनेक सहकारी शिक्षक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सागर जोईल यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. पांडुरंग हावळे सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, शिक्षकवर्ग, शाळा समिती तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.












