कणकवलीत काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

कणकवली येथे लग्न सोहळ्यासाठी दुचाकीवरून येत असताना सांगवे पामतेल येथे एका अज्ञात वाहनाने दुचाकीला
जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले बाळकृष्ण आत्माराम सावंत (७५, रा. भिरवंडे) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री ८.२० वाजण्याच्या सुमारास घडला. शुभम बद्रीनाथ सावंत (२७, भिरवंडे) आणि बाळकृष्ण आत्माराम सावंत हे दोघे रविवारी रात्री दुचाकीवरून भिरवंडे येथून कणकवली येथे एका लग्न सोहळ्यासाठी निघाले होते. दरम्यान, सांगवे पामतेल परिसराजवळ आले असता, पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार शुभम सावंत यांना किरकोळ दुखापत, तर मागे बसलेले बाळकृष्ण सावंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.