कुडाळमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

कुडाळ तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररील्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धाड टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत ३ तयार बंदुका, ६ बॅरल आणि बंदूक बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी जगन्नाथ शंकर मेस्त्री (वय ६५, रा. निरुखे सुतारवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

जिल्ह्यात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कुडाळ परिसरात गस्त घालत असताना, निरुखे सुतारवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध अग्निशस्त्रे तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने २७एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास निरुखे येथे छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून ३ तयार अग्निशस्त्रे, बंदुकीचे ४ लाकडी बट, ६ लोखंडी बॅरल आणि शस्त्रे तयार करण्यासाठी लागणारे वेल्डिंग मशीन, ग्राइंडर व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी संशयित जगन्नाथ मेस्त्री याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५ व २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.