जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वैभववाडी तालुक्याचा दौरा करून प्रशासकीय कामकाज, आरोग्य व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या जनगणना 2027 मोहिमेच्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात आयोजित घरगणनेच्या प्रशिक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. जनगणना प्रक्रिया अचूक, शिस्तबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देत तेथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी, औषधसाठा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची तपासणी करून रुग्णांना वेळेवर व दर्जेदार सेवा मिळावी यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. नाधवडे परिसरातील शेतकरी निता बाळकृष्ण कुपटे व राजेश परशुराम तावडे यांच्या शेताला भेट देत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी आंबा व काजू पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची सविस्तर माहिती घेतली. पंचनामा प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक पद्धतीने पार पाडावी, यावर भर देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. या पाहणीवेळी प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, उपअधीक्षक भूमी अभिलेख सचिन गवारी, ग्राम महसूल अधिकारी बागल, सहाय्यक कृषी अधिकारी शेळके तसेच ग्राम विकास अधिकारी घुगे आदी उपस्थित होते.












