कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सातबारा उतारा मिळणे कठीण

अलिबाग : भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनमुळे सातबारा पोर्टल गेल्या काही दिवसांपासून ठप्प असून ‘सव्र्व्हर डाउन’ आणि ‘एरर’च्या सततच्या समस्यांमुळे ऑनलाइन सेवा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पीककर्जासाठी आवश्यक असलेला सातबारा उतारा वेळेत उपलब्ध होत नसल्याने कर्ज प्रक्रियेलाच मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
भूमिअभिलेख विभागाकडून संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी हे काम अपेक्षेपेक्षा जास्त काळ चालल्याने सेवा अद्याप पूर्ववत झालेल्या नाहीत. परिणामी सातबारा उतारा, आठ-अ उतारा, फेरफार नोंदी, म्युटेशन प्रक्रिया यांसह जमीन अभिलेखाशी संबंधित सर्व ऑनलाइन सेवा ठप्प झाल्या आहेत. संकेतस्थळ उघडण्यात अडथळे येणे, ‘सर्व्हर डाउन’ व ‘एरर’चे संदेश सतत दिसणे, दस्तऐवज डाउनलोड न होणे तसेच अर्ज प्रक्रिया पूर्ण न होणे अशा तांत्रिक अडचणींचा सामना शेतकरी व नागरिकांना करावा लागत आहे.
खरीप हंगामासाठी पीककर्ज घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. बँकांकडे कर्जासाठी अर्ज करताना सातबारा उतारा सादर करणे बंधनकारक असल्याने सध्या अनेक शेतकरी कागदपत्रांच्या प्रतीक्षेत अडकून पडले आहेत. काहींनी कर्जासाठी अर्ज करण्याची तयारी पूर्ण केली असली तरी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने प्रक्रिया पुढे सरकत नाही. त्यामुळे पेरणीचे नियोजन आणि शेतीच्या कामांवर याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.