देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत प्राचार्य विजयकुमार सखाराम कदम आणि सुप्रिया विजयकुमार कदम यांनी संस्थेचे पहिले मानद अधिक्षक अण्णासाहेब कदम यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता व्यक्त करीत शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी एक लाख एक्कावन्न हजारांच्या देणगीचा धनादेश सुपुर्द करत संस्थेशी असलेले ऋणानुबंध दृढ केले आहेत.
शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संस्थेच्या शाळा नुतनीकरण उपक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी, दहावीच्या अनेक बॅचेस, संस्थेचे हितचिंतक पुढे येऊन सढळ हस्ते निधी संकलन केले आहे. या निधीतून शाळेतील वर्गखोल्याचे नूतनीकरण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
विजयकुमार सखाराम कदम हे शाळेचे माजी विद्यार्थी असून शिक्षक, पर्यवेक्षक ते माजी प्राचार्य असा त्याचा शिक्षण क्षेत्रातील प्रवास राहिला आहे. सेवानिवृत्ती नंतरही संस्थेत त्यांचे कायम शैक्षणिक योगदान राहिले आहे. संस्थेच्या शाळा समितीचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. सुप्रिया कदम ह्या जिल्हापरिषद केंद्रशाळा शिरगांव नं १ च्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका असून शिक्षण क्षेत्रात त्याचेही योगदान आहे. देणगीचा धनादेश कदम दांपत्याने २१ एप्रिल रोजी शाळा समितीकडे औपचारिकरित्या सुपूर्त केला.
यावेळी संस्थेचे संचालक अमित साटम, मानद अधिक्षक संदीप साटम, शाळा समिती सदस्य दिनेश साटम,मंगेश लोके, मुख्याध्यापक शमशुद्दीन आत्तार सेवाजेष्ठ शिक्षक उदयसिंग रावरणे शिक्षक प्रतिनिधी हेमंत सावंत सहाय्यक शिक्षिका स्नेहा कांदळगांकर, कृष्णा कदम आदी उपस्थित होते.
कदम दांपत्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर माजी विद्यार्थ्यांसाठीही हा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.











