मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
रुग्णालयात दाखल असल्याने शरद पवार आज बारामतीमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, शरद पवार यांना नियमित तपासणीसाठी आणि काही वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्या विविध चाचण्या (Tests) सुरू आहेत. या वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक स्पष्टता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शरद पवार यांना मागील महिन्यात प्रकृती अस्वास्थामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती सध्या सामान्य आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील प्रकृती आणि त्यांचे वय लक्षात घेता, केवळ खबरदारी (Precaution) म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या (Tests) सुरू आहेत. या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतरच डॉक्टर त्यांच्या पुढील उपचारांबाबत किंवा डिस्चार्जबाबत निर्णय घेणार आहेत.












