जि प अध्यक्षपदी प्रमोद कामत यांच्या नावाचा शिक्कामोर्तब ; उपाध्यक्षपदी दादा साईल यांची निवड

सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा प्रश्न अखेर सुटला. भारतीय जनता पक्षाने या मानाच्या पदासाठी प्रमोद कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, त्यांच्या नावाला माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. आज संपन्न झालेल्या भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीत कामत यांचे जंगी स्वागत करण्यात आले असून, त्यांना सव्वा वर्षाचा कार्यकाळ देण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तर उपाध्यक्षपदी शिदे- शिवसेनेचे दादा साईल यांची निवड झाल्याचे समजते.
प्रमोद कामत यांची ओळख नारायण राणे यांचे अत्यंत कट्टर आणि निष्ठावंत समर्थक म्हणून जिल्ह्याला आहे. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सभापती म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असून, प्रशासकीय कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. केवळ राजकारणच नव्हे, तर सामाजिक कार्यातही ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यांचा तळागाळातील सामान्य जनतेशी असलेला दांडगा लोकसंपर्क आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊनच, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ही मोठी संधी देण्यात आली आहे.
दुसरीकडे, महायुतीमधील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेकडून निलेश राणे यांचे कट्टर समर्थक दादा साईल यांचे नाव फायनल झाले आहे. मात्र, भाजपकडून कामत यांचे नाव फायनल झाल्याने आता सर्वांचे लक्ष दुपारी ३ वाजता होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे. सव्वा वर्षाच्या या आगामी काळात प्रमोद कामत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाची कोणती नवी गंगा जिल्ह्यात आणतात, हे पाहणे उत्सुकत ठरेल.