ना. नितेश राणे यांच्या ‘राणे पॅटर्न’ ला बिनविरोध पसंती
साईनाथ गांवकर / कोकणशाही
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाने राजकीय ताकदीचे प्रभावी प्रदर्शन घडवत सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. तब्बल 50 पैकी 5 जिल्हा परिषद जागा आणि 100 पैकी 6 पंचायत समिती जागा बिनविरोध जिंकत भाजपाने जिल्ह्यात आपले संघटन किती भक्कम आहे हे दाखवून दिले आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर येणाऱ्या निवडणूक रणधुमाळीत भाजपाचा विजयाचा इशारा मानला जात आहे.
जिल्हा परिषदेत भाजप- महायुतीची सरशी
खारेपाटण येथून प्राची इस्वालकर, बांदा येथून प्रमोद कामत, जाणवली येथून रुहिता राजेश तांबे, पडेल येथून सुयोगी रविंद्र घाडी आणि बापर्डे येथून अवनी अमोल तेली — हे पाचही उमेदवार बिनविरोध निवडून येत भाजपाच्या खात्यात थेट विजयाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी शिवसेना-भाजप समन्वयातून उमेदवारी देत महायुतीने विरोधकांना मैदानात उतरण्याआधीच नामोहरम केले.
पंचायत समित्यांतही भाजपाचा दबदबा
कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यांत पंचायत समितीच्या एकूण पाच जागा बिनविरोध भाजपाकडे गेल्या. वरवडे येथून सोनू सावंत, देवगड तालुक्यातून अंकुश ठूकरूल, गणेश राणे, संजना लाड आणि वैभववाडीतील कोकिसरे येथून सौ. साधना नकाशे — या सर्वांनी विरोधकांविना थेट विजय मिळवला.
विरोधकांची नामुष्की, भाजपाचा आत्मविश्वास दुणावला
बिनविरोध विजय म्हणजे केवळ नशीब नाही, तर संघटन, रणनीती आणि जमिनीवरील पकड यांचा परिणाम आहे. अनेक मतदारसंघांत विरोधक उमेदवार उभेच राहू शकले नाहीत, ही बाबच भाजपाच्या वाढत्या प्रभावाची साक्ष देणारी आहे. जिल्ह्यात महायुतीची हवा किती जोरात वाहतेय, हे या निकालांनी स्पष्ट केले आहे.
७ तारखेला विजयाचा गुलाल महायुतीचाच?
जिल्हा परिषदेत 50 पैकी 5 आणि पंचायत समितीत 100 पैकी 6 जागांवर आधीच बिनविरोध विजय — हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, असा सूर भाजपाच्या गोटातून उमटत आहे. येत्या 7 तारखेला मतमोजणीनंतर सिंधुदुर्गात विजयाचा गुलाल महायुतीच उधळेल, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
सिंधुदुर्गच्या राजकारणात भाजपाने टाकलेली ही जोरदार मुसंडी आता जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समित्यांवर सत्ता परिवर्तनाचा स्पष्ट इशारा देत आहे.












