
मुंबई : शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, तसेच आगामी काळातील कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील काही महिन्यांत, विशेषत: नगरपरिषद–पंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात वाद निर्माण झाले होते. राणेंनी चव्हाणांवर निवडणुकीमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनी महायुतीत तणाव निर्माण केला होता. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच महायुती होऊ शकली नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मात्र निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेत आपल्यातील वाद आता संपुष्टात आल्याचं दर्शवलं आहे. काही दिवसांपूर्वी विधीमंडळ परिसरातही या दोन्ही नेत्यांमध्ये हसतखेळत भेट झाली होती. त्यावेळी निलेश राणेंनी चव्हाण हे आपल्या मोठ्या भावाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. कोकणशाही मुंबई








