सावंतवाडी : निरवडे येथील भरवस्तीत सुरू असलेल्या वराह पालन व्यवसायामुळे होणारी प्रचंड दुर्गंधी आणि ध्वनीप्रदूषण याविरोधात पारकर कुटुंबीयांनी पुकारलेले बेमुदत उपोषण अखेर यशस्वी झाले आहे. स्वातंत्र्यदिनी सुरू केलेल्या या उपोषणाची ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर योगेश पारकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हे आंदोलन अधिकृतपणे मागे घेतले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निरवडे ग्रामपंचायतीने उपोषणकर्ते योगेश पारकर, प्रमिला पारकर, लक्ष्मण पारकर आणि सावित्री पारकर यांना अधिकृत पत्र सुपूर्द केले आहे. या पत्रात नमूद केल्यानुसार, संबंधित वराह पालन व्यवसायाबाबत प्रशासकीय स्तरावर तातडीने अहवाल मागवण्यात येणार आहे. या अहवालाची पाहणी करून पुढील आठ दिवसांत यावर ठोस व सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट आश्वासन प्रशासनाने दिले आहे. प्रशासनाने दिलेल्या या लेखी ग्वाहीवर विश्वास ठेवून पारकर कुटुंबीयांनी तूर्तास हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. उपोषणाची दखल घेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी केली. यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, सभापती सुष्मिता जाधव, गटविकास अधिकारी निलेश जाधव, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, विस्तार अधिकारी अंकुश जंगले व वैभव सावंत, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र देसाई, ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, तसेच कृष्णा बांदिवडेकर, झेवियर फर्नांडिस, नागेश गावडे, दत्ताराम गावडे, भूषण बांदिवडेकर आणि कोतवाल तुषार वालावलकर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भाजप नेते संदीप गावडे, प्रमोद गावडे आणि पोलीस पाटील अजित वैज यांनीही भेट देऊन पारकर कुटुंबीयांशी चर्चा केली. ग्रामपंचायतीने दिलेल्या मुदतीत योग्य ती कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.











