सावंतवाडी : शहरातील एसटी बस स्थानक समोरिल मुख्य मार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे गुरुवारी दोन महिलांचे अपघात झाले. तर अपघातांचे सत्र सुरूच असून पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी आक्रमक पवित्रा घेत नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप महिला मोर्चान आक्रमक पवित्रा घेत मडगावकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरत न. प. अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेत सर्व खड्डे तात्काळ बुजवण्याच्या सूचना केली.
बस स्थानकासमोरील मुख्य दोन ठिकाणी खड्डे पडले आहेत, या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खोलीचा अंदाज येत नाही. खड्यांचा अंदाज न आल्याने दोन महिला पडल्याची गंभीर घटना घडली होती. ही बाब निदर्शनास येताच भाजपा शहर महिला मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली. पर्यटन उद्यान सभापती मोहिनी मडगावकर यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी बोलावून रस्त्याची प्रत्यक्ष दुरावस्था आणि परिस्थिती दाखवून दिली.
या मोठ्या खड्डयांमुळे पादचारी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात अपघातांची तीव्रता अधिकच वाढल्याने, या मार्गावरील सर्व खड्डे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी आग्रही मागणी महिला मोर्चाने केली. यावर प्रशासनाच्यावतीने खड्डे बुजवण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आंदोलनात नगरसेविका तथा सभापती मोहिनी मडगावकर यांच्या समवेत भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस मेघना साळगावकर, साक्षी गवस, ज्योती मुद्राळे, मेघा भोगटे, तृप्ती विर्नोडकर यांच्यासह इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या












