प्रशासन झोपले, मजुरांनी दाखवली जबाबदारी; स्वखर्चाने बुजवला धोकादायक खड्डा

देवगड : देवगड-दाभोळे मार्गावरून कुणकेश्वर, आचरा, मालवण या ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. याच मार्गावरील दाभोळे पुलानजीकच्या उतारावरच गेले अनेक महिने भला मोठा खड्डा पडलेला आहे. मात्र या खड्ड्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे या खड्ड्याचा विस्तार वाढतच गेला.
पावसाच्या पहिल्या सरीत हा खड्डा अधिकचा धोकादायक बनला. कोणताही अपघात होऊ नये या भावनेने दाभोळे-पाटथर येथील मोलमजुरी करणाऱ्या अनिल अ गोरवले, अनिरूद्ध सावंत, अन्वी अनिरूद्ध सावंत व राजेश्री धुरी आदींनी स्वखर्चाने खडी, वाळू, आणि सिमेंटचा वापर करून खड्ड्याची बुजवणी केली.
यामुळे या कष्टकरी लोकांचे या मार्गावरून सतत ये-जा करणारे प्रवाशी आनंद देवगडकर व इतर वाहनधारकांनी आपली वाहने थांबवून कौतुक केले.