मालवण-कुडाळ रेल्वे स्टेशन एसटी सेवा पुन्हा सुरू करा; प्रवाशांची जोरदार मागणी

कुडाळ : मालवण-कुडाळ रेल्वे स्टेशनदरम्यान पूर्वी सुरू असलेली एसटी बससेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची
मागणी मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कमलाकर गवंडे यांनी एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालवण-कुडाळ मार्गावरील एसटी बससेवा पूर्वी कुडाळ रेल्वे स्टेशनपर्यंत सुरू होती. मात्र, रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे ही सेवा काही काळासाठी कुडाळ आगारापर्यंत करण्यात आली होती. आता संबंधित रस्त्याचे काम पूर्ण झाले असून वाहतुकीसाठी मार्ग पूर्णपणे खुला आहे. १० जून रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता बस व अन्य अवजड वाहनांच्या वाहतुकीस कोणतीही अडचण नसल्याचे निदर्शनास आले आहे. असे असतानाही मालवणहून येणाऱ्या एसटी बस कुडाळ रेल्वे स्टेशनपर्यंत न नेता केवळ कुडाळ आगारापर्यंतच चालविल्या जात आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आगार ते रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशन ते आगार असा अतिरिक्त प्रवास रिक्षाने करावा लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मालवण-कुडाळ रेल्वे स्टेशन बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी. मागणी गवंडे यांनी केली आहे. तसेच सेवा सुरू करण्यात कोणती अडचण असल्यास त्याची कारणे लेखी स्वरुपात कळवावीत, अशीही विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.