ऑनलाइन जुगार, मटका आणि गेमिंगवर कारवाईचा बडगा; मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित आढावा बैठक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस दलाच्या सायबर गुन्हे प्रतिबंधक कामकाजाच्या अनुषंगाने आज मंत्रालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित आढावा बैठक पार पडली. ऑनलाइन गेमिंग, मटका, जुगार तसेच इतर अवैध सायबर स्वरूपाच्या कृत्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. अशा बेकायदेशीर कारवायांमुळे समाजात निर्माण होणारे दुष्परिणाम लक्षात घेता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी संबंधिताना देण्यात आल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अवैध कृत्यांना थारा मिळू नये, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सायबर पोलीस, स्थानिक पोलीस व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
सिंधुदुर्ग हा साक्षरतेच्या दृष्टीने राज्यातील अग्रगण्य जिल्ह्यांपैकी एक असल्याने नागरिकांमध्ये सायबर जनजागृती वाढविणे, युवकांना ऑनलाइन फसवणूक व अवैध ऑनलाइन व्यवहारांपासून दूर ठेवणे आणि अशा गुन्ह्यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाया अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे, सायबर गुन्हे, ऑनलाइन जुगार व इतर अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवून कारवायांची तीव्रता वाढविण्याचे कडक निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम, सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण कोल्हे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.