आईच्या नावाने वृक्ष, पर्यावरणासाठी दृढ निश्चय; आ. प्रमोद जठारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने सर्वोदय नगर येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत कांचन, मोहगणी, बहावा अशा प्रकारची 15 झाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. ‘आईच्या नावाने एक वृक्ष लावा’ – आमदार जठार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या अभियानांतर्गत “एक पेड माँ के नाम” हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी आमदार प्रमोद जठार म्हणाले, “आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच, पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची शपथ घ्यावी.” निसर्गाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. वृक्षारोपणाच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेत प्रत्येक विभागातील बूथवर किमान 25 झाडे लावण्याचे निर्देश आमदार प्रमोद जठार यांनी सर्व नगरसेवकांना दिले आहेत. शहराचा परिसर हिरवागार आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, मंडल अध्यक्ष व आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, रणजीत देसाई, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नियोजन समिती सभापती आनंद नेवगी, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, तसेच निलम नाईक, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर, सिद्धार्थ भांबुरे आणि शिवसेना नगरसेवक अजय गोंदावळे उपस्थित होते.या मोहिमेत भाजपाचे सर्व प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर आणि बूथ पातळीवरील पदाधिकारी, तसेच सर्व आघाड्यांचे अध्यक्ष व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वृक्षारोपण उपक्रमामुळे सावंतवाडी परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले.