जागतिक पर्यावरण दिनी मालवण-हडीत कांदळवन स्वच्छता अभियान; भेलंडा वृक्षांची लागवड

मालवण : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज दि. ५ जून रोजी विभागीय वन अधिकारी कांदळवन दक्षिण कोकण व वनपरिक्षेत्र अधिकारी, मालवण कांदळवन यांच्या विद्यमाने मालवण तालुक्यातील पाणखोल जुवा, हडी येथील राखीव कांदळवन क्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी भेलंडा (Xylocarpus granatum) या कांदळवन प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी वनपरीक्षेत्र अधिकारी कांदळवन मालवण, वनपाल मालवण, हडी गावचे सरपंच तोंडावळकर, वनरक्षक आचरा, वनरक्षक देवली, कांदळवन सह व्यवस्थापन समिती हडी, पाणखोल जुवा, कोतेवाडा आणि गावकरवाडा समितीचे अध्यक्ष व सदस्य, उपजीविका प्रकल्पचे लाभार्थी उपस्थित होते.याशिवाय वनशक्ती NGO, युथ बिट्स NGO, वसुंधरा जनकल्याण प्रतिष्ठानचे सभासद, UNDP ECRICC प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक, कांदळवन प्रतिष्ठानचे उपजीविका तज्ञ, सिंधुदुर्ग प्रकल्प समन्वयक, प्रकल्प सहाय्यक, दिलासा जनविकास प्रतिष्ठानचे प्रकल्प समन्वयक आणि वनमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कांदळवन परिसंस्थेचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कांदळवन क्षेत्रातील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. भेलंडा या दुर्मिळ होत चाललेल्या कांदळवन प्रजातीची लागवड करून जैवविविधता वाढवण्यावर भर देण्यात आला.