सावंतवाडी : निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याने मतदारांच्या डिजिटल मॅपिंगमध्ये ९१ टक्के टप्पा पूर्ण करून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. सुरुवातीला संथ गतीने चाललेल्या या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः आढावा घेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बूथ पातळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि तांत्रिक अडचणी दूर केल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्याने अल्पावधीतच हे यश मिळवले असून आगामी तिसऱ्या टप्प्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.या विशेष मोहिमेअंतर्गत सध्याच्या मतदार यादीतील मतदारांची नावे थेट सन २००२ मधील मतदार यादीशी जोडली जात आहेत, ज्यामुळे मतदार यादी अधिक स्वच्छ आणि पारदर्शक होणार आहे. जिल्हा निवडणूक विभागाच्या उत्तम नियोजनाखाली कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून हे काम वेळेत पूर्ण करून घेतले आहे.












