कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा येथे शनिवार, ९ मे रोजी सकाळी झालेल्या कार अपघातातील जखमी चालक सचिन भास्कर सावंत (५०, रा. विक्रोळी, मूळ रा. हिर्लोक) यांचेही कुडाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. या भीषण अपघातात त्यांच्या पत्नी मीरा सावंत यांचा जागीच मृत्यू झाला होता. पती-पत्नी दोघांचाही या अपघातात अंत झाल्याने सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विक्रोळी येथे राहणारे सावंत कुटुंब शुक्रवारी उत्तर रात्री आपल्या खासगी कारने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिर्लोक या आपल्या मूळ गावी येण्यासाठी निघाले होते.











