वनविभागाची मोठी कारवाई; २९ घनमीटर खैर लाकूड जप्त, चालक गाडी टाकून पसार

सावंतवाडी : येथील वनविभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून खैर लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे १२ ते १४ लाख रुपये किमतीचा २९ घनमीटर खैराचा साठा जप्त करण्यात आला आहे. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत. वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ‘MH 07-1475’ क्रमांकाच्या टेम्पोमधून विनापरवाना खैराची वाहतूक होणार होती. या माहितीच्या आधारे आजगाव आणि बांदा वनपरिमंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बांदा फॉरेस्ट चेक पोस्ट आणि इन्सुली खामदेव नाका परिसरात सापळा रचला होता. दरम्यान, संशयित टेम्पो बांदा चेक पोस्टवर न थांबता अत्यंत भरधाव वेगाने निघून गेला. वनरक्षक वैभव इथापे यांनी तात्काळ या वाहनाचा पाठलाग सुरू केला. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना हुलकावणी देण्यासाठी टेम्पो चालकाने खामदेव नाक्यावरून अचानक यू-टर्न घेतला आणि गाडी पुन्हा गोव्याच्या दिशेने सुसाट पळवली. वनकर्मचाऱ्यांनीही त्याचा थरारक पाठलाग सुरूच ठेवला. अखेर पत्रादेवी गोवा चेक पोस्टच्या मागे वनविभागाच्या पथकाने या टेम्पोला घेरले. आपल्याला पकडले जाणार असल्याचे लक्षात येताच चालकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला लावला आणि अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. वनविभागाने टेम्पो ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर खैराचे लाकूड आढळून आले. प्राथमिक चौकशीत हा जप्त केलेला खैर माल आणि टेम्पो वजराठ येथील गोविंद गवस यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे. हा माल दोडामार्ग येथून विनापरवाना गोळा करून तळवडे येथे नेला जात होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. ही कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आजगावचे वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप यांच्या पथकाने केली. या थरारक कामगिरीत वनरक्षक वैभव इथापे, अतुल पाटील, प्रकाश रानगीरे, श्री. मोहिते आणि गोवा वनविभागाचे वनरक्षक विशाल परब यांनी केली.